विश्वनिवासी हिंदू..!!!

              विश्वनिवासी हिंदू


🪷☘️    *विश्वनिवासी हिंदू*      ☘️🪷


नसे हिंदू मी, मुसलमान वा नसे नसे मी ख्रिश्चन ..

कोंदणात मज डांबू शकेना कोणतेच बंधन..


नसे एकचि वास्तु जेथ मम निष्ठा एकवटलेली..

विश्वा कुटुंब मानुनी असे अभिन्नता नटलेली..


नसेल जरी मम शिखा शिरी वा नसेल भाळी गंध..

गळ्यात माझ्या घालून घेई न कसलाच मी बंध..


गळले धोतर, विजार आली सप्तसिंधूपलिकडून..

परी नच माझे सत्व पळाले, आभरणा आडून..


वेदांचे प्रामाण्य मानी मी, जे असे आप्तवाक्य..

सकल संत जे आप्त, तयांचे स्वरूपी असे ऐक्य..


देवदेवतांमधील भिन्नता वाढवी अमुचे वैभव..

भग्न जाहली जरी मन्दिरे, देवत्वा नसे अभाव..


मूर्तींना जरी तडे द्यावया, असुर सरसावले..

बिभत्सता अन् क्रौर्य धरुनी, हाती ते धावले..


देवांच्या परी कधी न गेला देवत्वाला तडा..

आकाश कधी दुभंगेल का जरी फोडिला घडा ?


भगवा, हिरवा, धवल, काळा रंगरंगोटी सारी..

रंगांचे मज नसे वावडे, वाहतो इंद्रधनु मम शिरी..


जरी असलो मी विश्वनिवासी, शांतीचा उद्गाता

आसिन्धुसिन्धुपर्यन्ता हीच आहे परि मम माता ..


अनादी, अनंत असा असे मी नावरुपापलिकडचा..

मातेचा परि पुत्र म्हणुनी, 'हिंदू' म्हणविन साचा..


ज्या मातेने निर्मिले अम्हा, सोसिले महत् कष्ट..

सकल तयेच्या संतानांची तीचि देवता इष्ट..


बंधनकारक नसे आम्हाला ग्रंथ कोणता एक ..

पथदर्शक मम अस्तित्वातून स्फुरणारा विवेक..


नित्य-सनातन-स्वधर्मपालन हेच जयाचे मर्म..

सामान्यतः जगभर ज्याला म्हणती 'हिंदू धर्म'..


व्याख्येमध्ये जसे न समावे मातेचे मातृत्व..

प्रसंगोचित तसेच प्रकटावे, हिंदूंचे हिंदुत्व..


_शब्दार्चन ~ पङ्कज_🪷

(३०.१०.२२ )_🪷☘️

Comments

Popular Posts