इतिहास - एक क्षितिज..!
इतिहास इतिहास म्हणतात तो असतो तरी कुठे ? ओळखायचा तरी कसा ? समजायचा तरी कसा ?
काही दस्तावेज, काही विरळ पत्रे.. काही तुरळक फर्मान, काही जुनी वस्त्रे...
..यांच्यातूनच का तो ओळखायचा ?
पाच सात तपांचं जिणं, त्यातील दिवसागणिक बदलणार्या गोष्टी, हजारो लोकांशी होत असलेला मुक्त संवाद, कधी गुप्त खलबतं, काही गुपितं...या सगळ्या सगळ्या गोष्टी काय लिहून ठेवत असतं कुणी ?
राजाच्या मनातील शल्य, वा राणीशी झालेला संवाद, खोल मनातील मनसुबे तर कधी दरबारात झालेला वाद... हे सगळे कागदोपत्री उतरता येते ? का ताम्रपटावर कोरले जाते ?
जे जे घडून गेले तो तर सगळाच इतिहास असतो.. काही पदचिन्हे रहातात, बाकी बराच आभास असतो... !!
मग जी जी चिन्हे मिटली, वा कांही मिटवली गेली...त्यातून जो लुप्त झाला....तोच का खरा इतिहास आहे ?
... का जे दिसतं, वा दाखवलं जातं, किंवा जे कागदोपत्रांवरून पटवलं जातं, त्यातही बराच भास आहे ?
निःशब्द बुरुजांवरून, डागल्या गेलेल्या कर्णभेदी तोफा, ती रक्तासाठी तहानलेली भू-आई, त्या तुटलेल्या तलवारी, ते विव्हळणारे सैनिक, त्यांच्या बायका-मुलांचं करूण क्रंदन, आणि तो गगनभेदी "हर हर महादेव....!" असा भयंकर रणघोष....हे कुणी कागदावर उतरवत असतं का कधी ?
आजही गगनाला भिडणारे उंचच उंच डोंगरी गडकोट, त्यांना निकामी करण्यासाठी तासण्यात आलेल्या चर्या, पाडलेले बुरूज, कोणे एके काळी जिथे पवित्र वेदमंत्रांच्या घोषात सारा आसमंत न्हाऊन निघे पण आज जिथे वेगळेच आवाज कर्कश भोंग्यांमधून ऐकू येतात अशा वास्तु... त्यांचा इतिहास काय कागदावर शोधता येईल..? ...का तो अदृश्यपणे आपल्याकडे आस लावून बसला आहे, आपण त्याला नेमकेपणे कधीतरी ओळखू या आशेवर...?
इतिहास तर मातीतील कणा-कणात, दगडा-दगडात सुप्त रुपात वसतोच आहे, त्या वास्तूंच्या भिंतींतून, भिंतींच्याही खालून, पडक्या वाड्यांच्या मोडक्या चौकटींतून, ज्यांचे बलिदान तर सोडाच पण नाव सुद्धा आपण विसरलो त्या अनामिक अगणिक पुण्यात्म्यांच्या, आसमंतात आजही ज्यांचा श्वासोश्वास जाणवतो आणि वन्दे मातरम् या पवित्र मंत्राचा अजपाजप करतो आहे त्या त्यांच्या जाणीवेतून आपल्याला जणू खुणावतोच आहे, खुणावतच रहाणार..!!
..त्याच्या खर्या खर्या विराटरूपाचे सम्यक दर्शन झाले असे ज्याला वाटेल, त्याच्यावर तो इतिहास मात्र हसतच असतो...!!
शेवटी इतिहास हा क्षितिजासारखा नाही का ?...सुदूर तर आहेच पण कितीही चालले तरी तो सम्पूर्णपणे हाताला कधीच लागणार नाहे, उलट तो तितकाच दूर आहे हे जाणवते...!!!
_( आज जरा मुक्त विचार वाहू दिले....यमक नाही, छंद नाही....!!! एक आतून आलेली विचारांची शृंखला, एवढेच..! खरे सांगायचे तर या ओळींच्या मागे एक अनामिक खोल वेदना आहे आणि त्या वेदनेच्या मुळाशी ताजमहालचे, मथुरेचे, लाल किल्ल्याचे आणि अशा अगणित वास्तुंचे, भग्नावस्थेत म्लान नजरेने बघत उभ्या असलेल्या असंख्य देवालयांचे, आपल्या महाराष्ट्रात, भारतात घडलेल्या महातेजस्वी क्रांतींची साक्ष देत उभे असलेले अनेक किल्ले, महान लोकोत्तर पुरुष ज्यांची गणना दधिची ऋषींशी व्हावी अशा भारतमातेच्या अगणित सुपुत्रांचे आणि सुकन्यांचे जेथे प्रत्यक्ष पाय लागले आणि तरीही साधी डागडुजी सुद्धा नीट न केलेल्या वास्तु...या सर्वांचे नग्न सत्य उभे आहे....जे खुणावते आहे आणि आशेने, धैर्याने विचारते आहे, ' अमृताच्या पुत्रांनो, डोळे तरी उघडा...!!! ' 🚩🙏🏽)_
विशेष दिवस - 🚩 *गुरु गोविंदसिंह जयंती * 🚩
~ _पङ्कज_
पौष शुद्ध (शुक्ल) ०७ भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक ०७ पौष १९४४ बृहस्पतिवासरः (गुरुवार) २९.१२.२२
—————
![]() |
| ( किल्ले सिंधुदूर्ग ) |
![]() |
| ( महाबळेश्वर येथील महादेव मंदिर ) |
![]() |
| 'साफा मस्जिद' या नावाने उभी असलेली 'कोकण-काशी गोमंतक' मधील एक वास्तू. |
![]() |
| ('साफा मस्जिद'ला लागूनच असलेले हे पवित्र ठिकाण, जेथे स्थानाचे पावित्र्य पाळले गेले नाही तर आजही नाग प्रकट होतो असे म्हणतात.) |
![]() |
| ( मुख्य वास्तुतीलच दगड वापरून बांधलेली मुसलमान मृतांची थडगी ) |
![]() |
| ('साफा मस्जिद' च्या आवारातील ही तळी. इथे बारमाही वहाणारा जिवंत झरा आहे. तळ्याच्या चौफेर देवदेवतांसाठी असाव्या तशा कोरीव जागा आहेत. पण त्यात देवता नाहीत...!!!) |
![]() |
| (हा वडाचा पार. मस्जिदीच्या आवारातील...! इस्लाममधील महत्वाचे मानक असावे.) |
![]() |
| (साफा मस्जिद, मागील बाजूने ) |










.jpeg)
Comments
Post a Comment