अनुनाद !!


स्वानुभवाहुन मोठा कोणी असेल का शिकविता ? 

इतरांच्या का संवेदनांनी, जन्मा येईल कविता ?


अनुभवाहुनी श्रेष्ठ असे ती अंतरसंवेदना..

अनुभवाविना कशी जाणविल मनास ती वेदना ?


अनुभव हा जरी भासत असला देहास चिकटला..

परि अंतरी कोमलतेच्या पुष्पांनी जो नटला,


अशा सुधीरां, जाणवते मग सखोल संवेदना..

प्रत्यक्ष जरी देहास कधी, नच होता वेदना..


संवेदनशील अंतःकरण भाग्याने लाभते ..

नसे जयांना, तयांस परि ते दुर्बलसे भासते ..


ऐसी संवेदना जन्मुदे सकलांच्या अंतरी.. 

होताचि अनुनाद पावते धरणी कंपन जरी..


सम आवृत्ती मिळते तेव्हा होतो अनुनाद...

सम वृतीही मिळती तेव्हा खुलेल सुसंवाद..


अन्न, वस्त्र वा भाषेत असे भिन्नभिन्नता जरी..

देव, देश अन् धर्माच्या भवनाची एकच पायरी..!


धर्माच्या मुळी भवनी नसतो नावरुपांचा भेद.. 

असा धर्म हा नोळखती जन, हाच वाटतो खेद..



~ शब्दसेवा - पङ्कज नेरूरकर / ०१.१२.२२

( टीप - अनुनाद = resonance, आवृत्ती = frequency )


Comments

Popular Posts