होय, मी पण सावरकर आहे !!!
होय, मी पण सावरकर आहे ..!!!🚩
भारतमातेचा सुपुत्र मी..
सकल हिंदुंचा सुमित्र मी..
या मातीतून युगांयुगांतून
अवतरणारा विविध रुपांतून..
ऋषीमुनींच्या तपःतेजाचा..
शूरविरांच्या पराक्रमाचा..
वसा घेऊनी अवतरणारा..
अनादि, अनन्त मी आहे...!
होय, मी पण सावरकर आहे..!!! - १
साम्राज्य माझ्या वसे मनात..
उणीव कैसीच नसे तयात ..
कोमल भावतरंगांवरूनी..
उडणारा जणु अलि होऊनी..
या सुमनांतील, त्या सुमनांतील..
मधू प्राषितो या विश्वातील..
माधुर्य मनी बाळगणारा..
भृङ्गराज मी आहे..!!!
होय, मी पण सावरकर आहे.!!! -२
पात्रांमागुन पात्रे येती..
रङ्गभूमिवर अभिनय करिती..
विश्वरुपी जणु रङ्गमञ्ची या..
आपआपली भूमिका करिती..
करावयाला सुरूपसज्जा..
सृष्टीतीलच रङ्गसङ्गती..
अद्भुत् नाट्याचा निर्माता,
नाटककार मी आहे..!
होय, मी पण सावरकर आहे..!!! -३
गुलाबकलिकेची कोमलता..
नात्यातून विना हरवीता..
हृदयातील निःशब्द जाणिवा..
नेत्र जयाचे टिपती जेव्हा..
सखेस अलगद अपुल्या हृदयी..
आकर्षी जो स्नेहलहृदयी..
भुरळ पाडी अप्सरांसही..
ऐसा, प्रियकर मी आहे..!
होय, मी पण सावरकर आहे...!!! -४
जीवन माझे एक रणाङ्गण..
नित्य करी मी आत्मपरिक्षण..
रिपूतील रिपुत्वास हेरुनी..
उच्चरवे रणभेरी वाजवुनी..
भय त्याच्या नेत्रांत दाटवुनी..
मनी परी हिंसा न बाळगुनी..
विजयश्रीस आणितो वरूनी..
ऐसा रणधीर मी आहे...!
होय, मी पण सावरकर आहे..!!! - ५
शास्त्रनिष्ठ शिक्षण मज भावे..
राष्ट्रनिष्ठ परि खचित असावे..
भाषा, व्याकरण शुद्ध असावे..
यथाप्रयोजन शब्द निर्मावे..
अपुल्या राष्ट्रभक्तीचेनि मिषे..
प्रयत्ने भाषाशुद्धीच प्रकाशे..
नित्य स्वकीय शब्दांचाच,
विनियोग मी करितो आहे..!
होय, मी पण सावरकर आहे..!!! -६
भगवद्गीतेचा अभ्यासक..
चिन्तक आणि निदिध्यासक..
प्रामाणिक मी एक उपासक..
वृत्तीने मी सावध साधक..
अवडंबर परि मला न भावे..
शरीरासच मन्दीर मानावे..
स्वधर्मकर्मांच्या पुष्पांनी,
अर्चन मी करिताहे...!
होय, मी पण सावरकर आहे..!!! -७
अभयं सत्वसंशुद्धी..
ज्ञानयोगव्यवस्थिती..
गुणांनी या मण्डित ऐसी,
मम अन्तःकरणाची स्थिती..
दानासवेच इंद्रियदमन,
करिता यज्ञी रत मनोमन..
स्वाध्यायी मी असे सर्वदा..
आर्जवी तपश्चरणी तथा.. - ८
वृतीने मी आहे अहिंसक..
विनाक्रोध कर्तृत्वाचा त्याग..
शान्त, अन्तरी मी नच निंदक..
निंदा जरी मी करी प्रासङ्गिक..
सर्वांभूती दयाभाव विलसता
इंद्रियी नच असे लोलुपता
मार्दवी परि निसुग नसे मी..
तत्वांच्या ठायी अचपल मी.. - ९
तेजाग्नी मनी प्रदीप्त सर्वदा..
क्षमेसवे, विलसे धृती सदा..
शुचिता अन्तर्बाह्य असूनी,
द्रोह अन्तरी न बाळगी कदा..
स्वधर्मकर्मे निष्कामपणे..
अलिप्तपणे नित्य आचरणे..
दैवी सम्पत्तीचा स्वामी..
ऐसा सावकार मी आहे...!!
होय, मी पण सावरकर आहे...!!! -१०
'हिंदुत्व-धुनी' माझ्या हृदयी,
अहोरात्र धगधगत आहे..
मानवतेच्या अखण्डयज्ञी,
समिधा मी चढवीत आहे..
सहृदयता आणि विवेक
जाळीती कटुता अशेष
ऐसा अवध्य, चिरंजीव मी,
एक "जिवंत विचार" आहे...! -११
होय, मी पण सावरकर आहे...!!!
होय, मी पण सावरकर आहे...!!!
होय, मी पण सावरकर आहे...!!!
🚩🚩🚩
वरील ओळींचे सादरीकरण कुमार. नीरज नेरूरकर याने केले आहे, त्या सादरीकरणाच्या चित्रफितीची कडी खाली दिली आहे.
https://youtu.be/-Z8yOOgFoIk
🍃🌻 ~ शब्दसेवा - पङ्कज नेरूरकर


.jpeg)
Comments
Post a Comment