तीर्थांचेही तीर्थ असे जे !!!
( खालील ओळी ह्या अंदमानच्या सेल्युलर जेलवरून सुचलेल्या आहेत. )
☘️☘️☘️
तीर्थांचेही तीर्थ असे जे
तव पुत्रांचे घडले जेथे
तपश्चरण अपार..॥धृ॥
हे भारतमाते तव गौरव
राखण्यास लढले नरपुंगव
ज्यांच्या वास्तव्याने पावन
भूमिचे झाले समरांगण
त्या तीर्थाच्या दर्शनमात्रे
आजही खवळुन उठती गात्रे
अशी जेथची महती आहे
आजही ग्वाही देतच आहे
सागरातले क्षार...॥१॥
इतिहास कोरला ज्यांवरती
कारागृहाच्या अभेद्य भिंती
पाझर फुटला दगडांनाही
आजही जो सुकलेला नाही
अश्रुंना मग वाट देत ते
हतबलसे काळे प्रस्तर ते
मूकपणे परि उभे ठाकती
झेलुनी अंतःकरणावरती
परयातनांचे वार...॥२॥
अमानुषतेचा थयथयाट तो
'अमानुष' जेथे शब्द लाजतो
अशाही परि परिस्थितीत
रंगत होती एकच भिंत
कमलाच्या देठागत होती
भावछटांची कोमलता ती
शब्दरुपे परि उमटत होती
करांत बैसुनी सरस्वती ती
लेवुनी सृजनतेचा हार..॥३॥
स्वेच्छे तुझ्याच करिता माते
क्षणात फुंकुनी तारुण्याते
सुरूंग लाविती परचक्राते
पोलादी कणखर बाहू ते
अथक कोलू फिरवित होते
तेल काढण्या स्मरुनी तूते
समूळ जाळण्या त्या हस्तांते
तुझ्या दिशें जे सरसावले ते...
परी कधी न मानिली हार..॥४॥
धगधगत्या महायज्ञामाजी
आहुती द्याया, स्वशरीरांची
कितेक चढले फासावरती
थरथर कापली होती धरती
अशाही वातावरणामधुनी
मानवतेची पेटवुनी धुनी
तपःपूत जणू दधिची मुनी
समतेचाचि पाठ पढवुनी..
देती सर्वांना आधार..॥५॥
यथावकाश स्वतंत्र झालीस
पुन्हा नवी वस्त्रे तू ल्यालीस
क्षते पाहुनी तव शरीरावरची
क्षुब्ध स्थिती झाली त्या मुनींची
तुझ्याचसाठी जीवित अर्पियले
सहकुटुंब सर्वस्वही समर्पियले
त्यांना कैसी ही स्थिती रुचेल
अखण्डता तव जेथ ढासळेल..
जणू जाहले, खोल खोलवर
हृदयावरती वार..॥६॥
दिवसांमागुनी दिवस गेले
तवचरणी लीन सर्वच झाले
जे जे तुझ्याच साठी लढले
लढता लढता अमर जाहले
भास तयांचा आजही होतो
जयघोष तुझा कानी पडतो
दगडादगडांचे निजमनोगत
आजही असते कानी पडत
तुटते हृदयाची तार..॥७॥
तीर्थांचेही तीर्थ असे जे..
तव पुत्रांचे घडले जेथे ..
तपश्चरण अपार..॥धृ॥
वन्दे मातरम् 🚩
_~ शब्दसेवा ~ पङ्कज_🪷
( छायाचित्र सौजन्य - श्री. विक्रम संपत लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्रातून. )



.jpeg)
Comments
Post a Comment