शिव शम्भू !!


अखण्डाच्या राज्यातून एक निखळला तारा..

जिजाऊंच्या उदरी त्याने क्षणभर घेतला थारा..


सहस्र सूर्यांच्या तेजाने प्रकाशिली ही वसुन्धरा..

रोवुनी भगवा महाराष्ट्राने त्यास आणिले घरा..


दमन रिपूंचे करुनी जयाने, बळे स्वराज्या स्थापियले..

आणिक त्याचे वर्धन करण्या, समग्र जीवन अर्पियले..


दास्यत्वाला समूळ जाळता, प्रचण्ड उठल्या ज्वाळा..

आसमन्त झळाळुन निघला, जो पडला होता काळा..!


त्या ज्वाळांनी पेटुनी उठला, वणवा चौफेर..

भक्षस्थानी अधर्म होता, ज्यां जाळीयले पार..


तेजोनिधीतुनी पुनः जन्मला त्या तेजाचा गोळा..

प्रमत्त ताण्डव करीत आला, साम्ब सदाशिव भोळा..


शक्तीबुद्धिचे सुरेख मिलन होते ज्याच्या ठाई..

पुत्र शिवाचा जणू तयाची, दुर्गा होती आई..


नाव तयाचे ऐकुनी कापे, शत्रू भीतीने..

सम्भा येउनी उभाच ठाके वायूच्या गतीने..


खड्गाचे चौफेर साण्डुनी,  प्रखरसे पाणी..

यवनांच्या पोचतसे कानी यमराजाची वाणी..


शिवप्रभूंच्या पदचिन्हांचा नित्य मागोवा घेती..

स्वराज्यरक्षण, स्वधर्मापालन अखण्ड ते करिती..


शिवरायांनी स्वराज्ययज्ञ जो, अखण्ड माण्डीला होता..

शम्भूलाही स्वप्राणाहुनी यज्ञ प्रिय तो होता..


जसे तयांचे होते जगणे जणू उखळता लाव्हा..

यज्ञामाजी तेजस्वीतेने वाहीले अपुल्या जीवा ..


नमन अमुचे हिन्दूजनांचे, अन् समग्र रयतेचे..

तेजाने तुवां पांग फेडीले, या भारतमातेचे...!!!


हर हर महादेव 🚩🚩🚩

( सोबत दिलेले छायचित्र हे श्री. वा सी बन्द्रे लिखीत छ्त्रपती शिवाजी महाराजांवरील चरित्रग्रन्थाचे मलपृष्ठावरील सम्भाजी महाराजांची मुद्रा आहे )


~ पङ्कज नेरूरकर



    ~ फाल्गुन वद्य अमावास्या ( श्री छत्रपती सम्भाजीमहाराज महाबलिदान दिन ) 


        ~    शब्दसेवा - पंकज नेरुरकर )

Comments

  1. संभाजीराजे यांच्या धर्म परिवर्तन न करण्याने हाल सोसून प्राणाहूती दिल्याने त्यांची प्रतिमा उदात्त होते.

    ReplyDelete
  2. खूप सुंदर!
    आपल्या कवितेतून शिव-शंभूंचा जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर येतो.काय ती प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि स्वधर्माचा जाज्वल्य अभिमान! नतमस्तक व्हायला होते अशा राष्ट्र पुरुषांच्या कार्याने आणि त्यांच्या बलिदानाने!
    जय शिव-शंंभो !
    जय महाराष्ट्र !

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts