घाव
घाव
निर्जीव दगडातून मूर्त झाले,
सौंदर्य दैवी मला प्राप्त झाले,
अलौकीक ऐशा तव हातातुनी रे ..
माझ्यातील दिव्यत्व जन्मास आले..
तुझे सोसिले मी किती घाव वर्मी..
असे त्याज्य ते सर्वही त्यागिले मी ..
तुझा घाव प्रत्येक माझ्यातले रे..
जन्मास घालीत होता मीपण रे..
अव्यक्तातुनी आरंभला जो प्रवास
लिलया नेलास रे तू पूर्णत्वास
नगण्य शिळेस आकारूनी तू..
केलेस तू शोभिवंत मंदिरास..
एके दिनी परी आला धावुनीया काळ..
चालूनी आले असुर आक्राळ-विक्राळ..
क्रूर हातांनी मजवर घालुनिया घाव..
अस्तित्वाला मम नच ठेवियला वाव..
आजही मी हृदयात जपला तो घाव...
क्षणिक जरी राहिला ना स्वजनांचा टिकाव..
भग्न जरी दिसले, परी नष्ट नच मी झाले..
प्रतीक्षा मज सरसावण्याची असुरांतक भाले..
अगणित ऐशा वास्तु ज्या करीती प्रतीक्षा..
'पुनरुज्जीवित होणे' ही बाळगुनी मनीषा..
निर्मिती जे करीती ऐशा घावांची आशा..
धरूनी मनी, उत्सुक पाहण्या दिव्य उषा..
( वरील चित्रातून त्या पुनर्निमिती करणार्या घावांच्या प्रतीक्षेत असलेल्या भग्न मूर्तीची वेदना अक्षरशः आपल्या कुंचल्यातून साकारणार्या श्री.सचिन वझलवार जींच्या सिद्धहस्तांना एक अल्पसा शब्दरूपी प्रतिसाद )
- पङ्कज 🪷
(०९.०५.२३)


.jpeg)
मूर्तीच्या वेदना साकारकरून शिल्पकारांना दाद देणारे वाक् शिल्प भावले
ReplyDeleteउत्तम शिल्पचित्र आणि शब्दचित्र सुध्दा...
ReplyDelete