मी इतिहास बोलू पाहातोय !

 


इतिहासाचे आपल्याला साकल्याने आकलन झाले आहे असे वाटणे हे प्रामाणिक इतिहास अभ्यासकाचे लक्षण नव्हे असे मला वाटते. दिवंगत तर सोडाच पण हयात असलेल्या व्यक्तींचे पूर्वजीवन सुद्धा त्या व्यक्तीखेरीज इतर कुणालाही पूर्णपणे समजले असण्याची शक्यता शून्य. मग असे असता एखादी लोकोत्तर व्यक्ती जेव्हा पर्वताएवढे कार्य करून जाते, त्या कार्याला असंख्य ज्ञात-अज्ञात आयाम असतात तेव्हा त्या व्यक्तीच्या कुठल्याही कृतीमागील, कार्यामागील, अगदी घटनेमागील सुद्धा सत्य आपल्याला यथार्थपणे समजणे तर केवळ अशक्यच अशक्य ! अशा पार्श्वभूमिवरून आणि एका मित्राने मला प्रतिक्रिया म्हणून लिहिलेल्या ' गेले राहुन द्यायचे तुझे, नक्षत्रांचे देणे' ह्या कविश्रेष्ठ श्री. चिं. त्र्यं. खानोलकर उपाख्य आरती प्रभु यांच्या ओळी हे एक प्रकारे इतिहासाचे मनोगत आहे असे मांडले. त्यावरून मनात उमटलेले भाव खालील शब्दविस्तारातून व्यक्त झाले.


आदरणीय कविश्रेष्ठ श्री. चिं. त्र्यं. खानोलकर उपाख्य आरती प्रभूंची क्षमा मागून, त्यांच्याच पिळवटलेल्या हृदयाच्या तळापासून निघालेल्या ओळींमधील एक ओळ उसनी घेऊन त्याच्या प्रकाशात माझ्या भावछटा व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे - 


🍃


*'मी इतिहास बोलू पाहातोय !'* 


गेले राहुन द्यायचे तुझे, नक्षत्रांचे देणे..

असे नशीबी मम मनोगत अव्यक्तच असणे..


जशी कधी ना लागे हाती क्षितिजाची रेषा .. 

पायी झाल्या आजन्म जरी तुडवुन दाही दिशा !


तसेच हृद्गत माझे कोणा यथार्थ कधी न उमगते.. 

शब्दांच्या पलिकडले गुह्य कसे कळावे मग ते ?


असे मला जे म्हणावयाचे आणि व्यक्त व्हायचे ..

नसती शिल्लक खुणाही ज्याच्या तेच खुणवायचे..


परी मी सोडुन प्राक्तनी असे इतरांच्या लिखित ..

की मलाही माहित नसलेले ते उघडावे गुपित .. !


अपूर्णच असे ओळख माझी, किती मी कळलो जरी..

अपूर्णत्व मम जया उमगते, तयाचीच विद्वत्ता खरी..


~ पङ्कज 🪷

(२९.०८.२३)

Comments

Popular Posts