मैत्र !!!

 


*'मैत्र'* 


आई आई, तो बघ कसा लाल लाल बिंब...!! 

पाण्यामधे डुबकी मारून झाला आहे चिंब !!


लाटांसवे वर खाली निवान्त डोलत आहे..

नावांसवे जणु काही हितगुज करीत आहे..


रात्र व्हायच्या आत मात्र रोज जातो घरी..

पुन्हा सकाळ होताच येतो, परिक्षा असली तरी..


आई गं, घर त्याचे आहे का गं खूप दूर...?

माझ्यासारखाच त्याला अभ्यास असतो का भरपूर ? 


घरी त्याच्या आपल्याच सारखा टिव्ही आहे का ?

हळुच चोरून कार्टुन नेट्वर्क हा ही बघतो का ?


घरी सोफ्यावरती कपडे हा सुद्धा फेकतो का ?

पालेभाज्या खायला याची आई ओरडत असेल का ?


एवढ्या थंडीत सकाळ सांज पोहायला का जातात ?

शाळा, अभ्यास बुडवून त्याला घरचे कसे सोडतात ?


आई आई, सांग ना गं, तू गप्प का अशी ?

सर्वांचा हा मित्र असून, बोलत का नाही माझ्याशी ? 


आई म्हणाली अजून तू खूप लहान आहेस..

मोठेपणी आपसुकच तू सगळे समजणार आहेस..


काही जरी विचारले तरी, आईचे हे असेच असते..

'मोठेपणी कळेल तुला' एवढेच ती बोलत असते....😒😒


☘️☘️☘️


इथे मित्र = 🌞


मैत्र = सुर्याशी मैत्र म्हणजेच,


..मित्राशी मैत्री,


म्हणजेच..... *मैत्र* 🌞😇


आज 'फ्रेंडशिप डे' च्या निमित्ताने ह्या काही ओळी. आमची फ्रेंडशिप अगदी थेट 'मित्राशी' ( 🌞 ) !!!


~ पङ्कज 🪷

०६.०८.२३


( छायाचित्र - वेळणेश्वरची एक रम्य संध्या )

Comments

Popular Posts