कमलदल
कमलदल ..
असेन जरी मी चिखलामध्ये सदैव रुतलेला ..
कंदरुपे कधी निगूढ राहुनी, नसेन फुललेला ..
विस्मृती परी कधी न होते मजला फुलण्याची ..
पंकी जरी मी रुतून असलो, तरी उमलण्याची ..
दलदल असता चहूबाजूनी, आम्हा तमा कसली ?
संथ जरी का असली तरीही नाही वाढ खुंटली..
जन्म जाहला चिखलात जरी, तरी आम्ही उमलू ..
अलिप्त राहुनी पाण्यावरती येऊनी आम्ही फुलू ..
सूर्य आमुचा सखा, तयाशी जन्मजन्मीचे नाते ..
आस तेवते नित्य उरी मम भेटण्यास तयाते ..
पुन्हा पुन्हा मज पंकी जरी का जन्मा तो घालील ..
रुतून त्यातच जरी राहिलो, जरी आटले सलील..
जो जन्माला धाडितोचि तो अनुकुलता ही देतो ..
ग्रीष्मामागे फिरोनी मग तो वर्षेला पाठवितो ..
अनुकूलता येता मम कंदा कोंब झणी फुटतो ..
पाण्यावर मग येऊनिया मम सौरभ दरवळतो..
त्याहीवरी जो अमुच्यामधला असे कृपापात्र ..
चरणी देईल स्थान तयाला श्रीहरी कमलनेत्र ..
चिखलापासूनी श्रीहरीचरणी अवघाचि प्रवास ...
सकलांनाही नित्य घडो ही मनी असे आस
~ शब्दसेवा ~ पङ्कज 🪷
(१२.०२.२४)


.jpeg)
Comments
Post a Comment