चिखलातील कागदी कमळ 🪷

 


माझ्यासकट दोन पिढ्यांनी कमळालाच मत दिले .. 

'हिंदुनिष्ठ सरकार असावे' असे आम्हास वाटत गेले..


'राजनीती भ्रष्टाचार आणि अनीतीचा चिखल आहे

कमळवाले वगळता इथे, प्रत्येक माणूस खल आहे '


असेच ठाम समजून आम्ही कमळावरच मारला शिक्का

'एक दिवस कमळ उमलेल' असा विश्वास होता पक्का ..


काळ्याकुट्ट अंधारी मग, चंद्रविकासी कमळ फुलले .. 

रात्र जरी असली तरी, काळोखास नाही जुमानले ..


चंद्रविकासी कमळ येता सर्वांचाच विकास होईल .. 

विकास होता मग कोणीही कधीही न उदास होईल .. 


आमची सुद्धा छाती होती छप्पन इंचानी रुंदावली ..

आमची देखील नजर होती विकासानेच सोकावली ..


जसे दिवस सरकत गेले, अंधार मात्र वाढत गेला .. 

कमळ धरू जाता हाती, चिखलच लागू लागला ..


मग समजले, ज्याला आपण कमळ समजत होतो .. 

सभोवती चिखल असूनही, अलिप्त समजत होतो .. 


हाय ! कमळ निघाले कागदी, चिखलच त्याचा ठाव .. 

अलिप्त तर लांबच, आम्हीच चिखलात फसलो राव !


हिंदुत्वाचा मुखवटा पण आतून साराच बाजार .. 

राम असो वा कृष्ण, आडून चालतो फक्त व्यापार .. 


कुणास मिळाले भगवे गाजर, कुणास हिरवा चारा ... 

परी असत्य अन् अधर्माचा चाले  निलाजरा पसारा ..


चिखलात फसून जरी आमचे कपडे मलीन झाले .. 

तरी अमुचे स्वत्व अजूनही नाही पराधीन झाले ..


आता पुन्हा तशी चूक, आम्ही नाही करणार ...

गांडुळ बनून चिखलातच, आम्ही नाही रमणार .. 


आम्हा वारसा उज्ज्वल आहे राम, कृष्ण, शिवरायांचा..

धर्मासाठी कर्तव्य पाळण्या स्वजनांशीही झगडण्याचा !


~ पङ्कज 

(१५.०५.२४)



ता. क -

नमस्कार. 

काल पाठवलेल्या ओळींमध्ये *चंद्रविकासी कमळ* अशी उपमा आलेली आहे. त्यावरून एका मित्राने विचारले की याचा संदर्भ काय. त्याला सांगितलेले स्पष्टीकरण खाली देत आहे -

चंद्रविकासी कमळ ही एक उपमा आहे. रात्रीतच जे कमळ उमलते त्याला चंद्रविकासी कमळ असे म्हणतात. रात्रीत अंधार असतो. अंधार हे अज्ञानाचे द्योतक आहे. *मतदार, जनता अंधारात असेपर्यंत कमळ उमलणार हे आता सिद्ध झालेले आहे.* जर सूर्यविकासी कमळ हवे असेल तर कमळाला आमूलाग्र बदल करावा लागेल. हे त्याच कमळाला अशक्य आहे.

आपण अंधारात राहावे की उजेडात तो प्रत्येकाचा निर्णय आहे. 🙏🏽

वन्दे मातरम् 🚩🙏🏽

Comments

Popular Posts