सूकान्योक्तिमाला
सूकान्योक्तिमाला
फुले कमळ अनुदिनी पाहुनी नभी द्युपतीते
असे उदकी जन्मले तरी भिजे कदापि न ते
अलिप्तता सहजचि असुनही अचलभाव तो
नसे परी तया ज्ञात गुणचि हा अती भावतो
असेल जरी श्रीकर उपमान असङ्गास ते
असेल जरी विष्णूचे नावचि कमलनेत्र ते
उभी जरी तयावरी ठाकते स्वये लक्ष्मी
असे हरिकृपे असे भाग्य विस्मये लक्षी मी
गजेंद्र झणी जाहला तव मिषे जिवन्मुक्त तो
हरीसी तुज वाहता गजही होतसे मुक्त तो
हरीसी दुष्कामना मार्गी ज्या हरिसी पोचतो
तुला पाहता मनास पद्माकर आठवतो
किती असो पंक तो सरोवरी नसे तुज तमा
तयातूनच जन्मुनी दाविसी हरविणे तमा
कशीही जरी जाहली स्वस्थिती प्रारब्धे जरी
ऊर्ध्व ऊर्ध्व जाऊनी निघशी तू जलाबाहेरी
जरी येऊनी वरी फुलसी तू स्वभावे परी
नाळ भूमिशी कदा भंगणे तुज न भावे तरी
स्वये स्थापिले करी तुज पुरूषोत्तमाने जरी
तरी न तू जननीसी तव विसरसी क्षणभरी !
🌷☘️
शब्दार्थ आणि टीप -
सूक ~ कमळ
द्युपती ~ सूर्य. द्यु म्हणजे आकाश.
श्रीकर ~ कमळाचे एक नाव. श्रींच्या हाती शोभते म्हणून श्रीकर. श्रींच्या हातांचा अलिप्तता हा गुण कमळाला आलेला आहे आणि कमळाच्या अलिप्ततेची उपमा श्रींच्या हातांना आहे. श्रींचे कर आणि श्रीकर हे उभयही उपमान आणि उपमेय असे दोन्ही आहेत. श्रीकरः हे भगवान विष्णूंचे एक नाव आहे आणि श्रीकरम् हे लाल रंगाच्या कमळाला म्हणतात.
कमलनेत्र - श्रीविष्णूंचे एक नाव.
पंक ~ चिखल
तम ~ अंधार, अज्ञान.
पुरूषोत्तम ~ श्रीविष्णूंचे एक नाव. चतुर्भुज अशा विष्णूच्या एका हातात कमळ आहे.
~ पङ्कज 🪷
( १५.०५.२४)


.jpeg)
कमळ असे फूल आहे की संस्कृत काव्यात शोभून दिसते. वास येतो कि नाही माहित नाही. फळ लागते का नाही माहित नाही. पण बड्या लोकांच्या हातात दिसते. त्यामधे बैठक घालून कसे बसायचे यावर चित्रकारीचे कसबपणाला लागते असो. आपल्या काव्यातून सुंदर रचना वाचायला मिळाली.
ReplyDelete