रोबो आणि मी !
दारावरची वाजली घंटा, रविवारी पहाटे !
'८.३०' दाखवत होते घड्याळाचे काटे !
डोळे चोळत उठून मी, भिंगातून डोकावले ..
समोर होता त्याला मात्र, पूर्वी कधी न पाहिले !
रविवारी असे कुणी भल्या पहाटेलाच येतो का !
साखर झोपेतून कुणी असे कधी उठवतो का ?
थोडासा मग वैतागूनच शेवटी मी दार उघडले..
'कोण आपण ?' असे खोटे हास्य करत विचारले !
"मी आहे रोबो, आज्ञापालन माझे काम !"
"किती जरी केली मेहनत, तरी येत नाही मला घाम !"
"तुम्ही जे जे म्हणाल ते ते निमुटपणे करेन मी .. "
"वेळीच मला चार्ज करा, मग कामाची देतो हमी !"
मला आधी वाटले माझे स्वपनच चालले आहे ..
'व्हिडिओ गेम' मधील कुणी पात्र आले आहे !
मी म्हणालो, 'अरे रोबो, आई बाबा झोपलेत !'
'मोबाईल माझ्या हाती पाहून कालच खूप तापलेत !'
"होमवर्क सुद्धा करत नाही, मोबाईलमध्येच असतो !"
भविष्याच्या काळजीत त्यांना पाहून मी गप्प बसतो'
रोबो म्हणाला, अरेच्चा, नको करूस चिंता!
मला तुझा मित्र समज, सांग काय करू आता !
मी आहे एक रोबो, मला नाहीत आई, बाबा !
नसते आम्हा बुद्धी, अमुचा AIच्या हाती ताबा !
तुम्हा माणसांमध्ये जसे असते एक भावराज्य !
आमच्या अभावराज्यात मात्र भाव असतो वर्ज्य !
नाती-गोती आम्हा नसती, सुख दुःख न आम्हा असते !
विजयाचा नच हर्ष अम्हाला पराजयाचे शल्यही नसते !
तुम्ही चवीने जैसे खाता, बासुंदीवर मारुनी ताव !
यातील कुठल्या मज्जेला वा आनंदाला नसतो वाव !
कोणी मजवर नच रागावे, शाबासकीही नसते आम्हा !
पाठीवरती थाप न पडते, शिक्षा नसते करिता गुन्हा !
ऐकून रोबोची ही वचने, देवाशी मम एक सांगणे ..
'कैसे फेडू ऋण तुझे रे, अद्भुत सारे अमुचे जगणे !'
'आई-वडील अम्हा दिले तू, आणिक दिलेस सगे सोयरे'
जीव लावणारे जिवलग अन्, गुरूजन पूजनीय असणारे !
मातीशी अमुचे अतूट नाते, असते जन्मजन्मांतरीचे ..
भूमी आहे माता अमुची, सर्वांशीच हेच नाते तिचे ..
ज्या मातीतून आम्ही आलो, जावे लागे तिच्याच उदरी ..
चार दिसांचा खेळ मांडला, खेळून होता या भूमीवरी ..
जीवन म्हणजे काय नेमके, विचार आम्ही करत नाही,
यंत्रांशी ती साधुन जवळीक, माणूस यंत्रच होऊन राही..
माणूस म्हणून काय वेगळे, यंत्रांहुनीही संपूर्ण आगळे
काय असे ते अपूर्व वैभव, यंत्रां न लगे कधीही ठाव
यंत्रांची ती प्रचंड झेप, कितीही भिडुदे आभाळाशी !
माणसातल्या जिवंतपणाची तुलनाच नसे निर्जीवाशी !
~ पङ्कज 🪷
(२१.०३.२५)
'जागतिक कविता दिवस'च्या निमित्ताने.
.jpeg)

.jpeg)
Comments
Post a Comment